शिक्षण विभाग (प्राथमिक)
प्रस्तावना –
आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये शिक्षण विभाग महत्वाची भूमिका बजावत आहे. 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थापन झाल्या. त्यावेळी ग्रामीण भागातील शिक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर देण्यात आली.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे शिक्षण विभागाचे प्रमुख असून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे नियंत्रणाखाली कामकाज करतात. सन 2023-24 च्या यु-डायप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 2682 प्राथमिक शाळा कार्यरत असून इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये एकूण १,१४,७८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकूण मंजूर प्राथमिक शिक्षक संख्या 6442 इतकी असून कार्यरत प्राथमिक शिक्षक 5734 इतके आहेत व एकूण मंजूर पदवीधर शिक्षकांची संख्या 1636 इतकी असून कार्यरत पदवीधर शिक्षक 1146 इतके आहेत.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार प्रत्येक ६ ते १४ वयोगटातील बालकांना शासकीय व अनुदानित शाळेमध्ये मोफत, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. केंद्रसरकार व राज्यसरकार यांच्या संयुक्त धोरणानुसार प्रधानमंत्री शक्ती पोषण निर्माण योजना, समग्र शिक्षा अभियान, उपस्थिती भत्ता इत्यादी योजना अंमलबजावणीमध्ये सातारा जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
ध्येय आणि धोरणे –
सातारा जिल्हा परिषद ही एक स्थानिक स्वराज्य संस्था असून शिक्षण विभाग व ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या सर्व योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत केली जाते. यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक नियुक्ती करणे, शालेय इमारत बांधकाम व दुरुस्ती, आदर्श शाळांची निर्मिती करणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणे, शिक्षक क्षमता संवर्धन करणे, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण, विद्यार्थी व्यक्तिमत्व स्पर्धा, क्रिडा स्पर्धा यांचे आयोजन करणे, प्राथमिक शाळांना विविध शैक्षणिक साहित्य पुरविणे इत्यादी योजना राबवून प्राथमिक स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे कामकाज शिक्षण विभागामार्फत केले जाते.
उद्दिष्टे आणि कार्य –
- ६ ते १४ वयोगटातील १००% विद्यार्थ्यांची पटनोंदणी करुन त्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे.
- विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबर प्रगती साधण्याचा प्रयत्न करणे.
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट प्राथमिक शाळांची निर्मिती करणे. त्यामध्ये डिजीटल क्लासरुम सुविधा उपलब्ध करुन देणे.
- विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थी व्यक्तिमत्व स्पर्धा, क्रिडा स्पर्धा, अतिरिक्त पूरक मार्गदर्शन व अध्ययन करणे.
- स्काऊट व गाईड प्रशिक्षण देणे.
- अविष्कार उपक्रमांतर्गत राज्यात व राज्याबाहेर शैक्षणिक सहलींचे आयोजन करणे.
- ज्ञानव्यवस्थापन आधारित अध्ययन, अध्यपन करणे इत्यादी उपक्रम राबविणे.
- बालकेंद्रीत आनंददायी व बालस्नेही शिक्षण पध्दतीची अंमलबजावणी करणे.
- प्रधानमंत्री शक्ती पोषण निर्माण योजनेंतर्गत इ. १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मानसिक विकासाबरोबर शारिरीक विकास होण्यासाठी मोफत मध्यान्न भोजन पुरविण्यात येते.
- समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.
प्रस्तावना :-
महाराष्ट्र शासनाने राज्यातील जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत सन 2022-23 मध्ये सातारा जिल्ह्यातील 25 शाळांची निवड आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून महाराष्ट्र शासनाने केली. सन 2023-24 मध्ये जिल्हा प्रशासनाने 25 जि.प. शाळा तसेच सन 2024-25 मध्ये 176 जिल्हा परिषद शाळा असे एकूण 226 शाळांचा जिल्हयातील प्रत्येक केंद्रातील एक आदर्श शाळा म्हणून विकसीत करण्याचा निर्णय घेतला.
सदर आदर्श शाळा विकसीत करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा परिषद स्वनिधी, मनरेगा, 15 वा वित्त आयोग,जिल्हा क्रीडा विभाग, लोकसहभाग, सीएसआर यांच्या विविध माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आदर्श शाळांकरिता सन 2023-24 व सन 2024-25 मध्ये शाळा दुरुस्तीकरिता रक्कम रु.10,53,00,000/-, शाळा बांधकामेकरिता रक्कम रु.99,85,00,000/-, क्रिडांगण विकसित करणेकरिता रक्कम रु.4,15,00,000/-, व पारेषण संलग्न सौर ऊर्जाकरिता रक्कम रु.2,95,00,000/- इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
माझी शाळा आदर्श शाळेची उदिष्टे–
1. जिल्हयातील प्रत्येक केंद्रातून एक शाळेची निवड करणे.
2. शालेय भौतिक सुविधा व सुधारणांमध्ये वाढ करणे.
3. सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे.
4. शैक्षणिक गुणवत्ता वाढीस प्रोत्साहन देणे.
5. लोकसहभाग वाढविणे.
6. शालेय वातावरण सुशोभित व प्रसन्न करणे.
7. मुलांचा शारिरीक, बौध्दिक व मानसिक विकास करणे.
8. विदयार्थाना आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणे.
9. शिक्षकांना प्रशिक्षण देवून त्यांची गुणवत्ता वाढविणे.
10. त्रयस्थ संस्थेमार्फत शाळांचे गुणवत्ता तपासणीसाठी मूल्यांकन करणे.
- मॉडेल स्कूल अंतर्गत 3 विभागामध्ये कामकाज केलेले आहे.
- भौतिक सुविधा
- शैक्षणिक गुणवत्ता
- लोकसहभाग
- :- जेवढे शिक्षक कार्यरत असतील त्या संख्येपेक्षा दोन वर्ग खोल्या अधिकच्या असा निकष मॉडेल स्कूलमध्ये ठेवण्यात आलेला आहे. अध्यापनाव्यतिरिक्त संगणक प्रयोगशाळा व विज्ञान प्रयोग शाळेसाठी अतिरिक्त वर्ग खोल्यांची गरज असल्याने सदरच्या निकषानुसार सर्व शाळांमध्ये या खोल्यांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यासाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या काही खोल्यांची दुरुस्ती करून तसेच धोकादायक वर्ग खोल्यांचे निर्लेखन करून त्या ठिकाणी नवीन वर्गखोल्या बांधण्याचे प्रयोजन केलेले आहे. सदर खोल्यांचे बांधकाम हे दर्जेदार होईल यासाठी जिल्हा परिषद मार्फत निकष निश्चित करुन देण्यात आलेले आहे.
- शालेय स्वच्छतागृह:- जिल्हा परिषदेचा 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत इ. निधीतून या मॉडेल स्कूल अंतर्गत सर्व शाळांमध्ये मुला-मुलींची स्वच्छतागृहे ही अत्याधुनिक पद्धतीची करण्यात येत आहेत, तसेच सदर स्वच्छता गृहांमध्ये नळाद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच दिव्यांग विदयार्थ्यांसाठी शौचालय सुविधा पुरविण्यात आली आहे.
- संरक्षण भिंत:- आदर्श शाळांमधील शाळांना संरक्षक भिंतीची व्यवस्था करण्यात येत आहे. गाव पातळीवर मनरेगामधून यांचे बांधकाम करण्यात येत आहे.
- जलपुनर्भरण:- शाळेच्या इमारतीवरील पावसाचे पडणारे पाणी एकत्र करून ते जमिनीमध्ये मुरविण्यासाठी जलपुनर्भरणाची व्यवस्था करण्यात येत आहे. सदरचे काम मनरेगा योजनेतून प्रस्तावीत केले आहे.
- पेव्हर ब्लॉक:- शाळेच्या स्वागत कमानीपासून शाळेच्या मुख्य इमारतीत पर्यंत विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ व नागरिक यांना येण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा रस्ता मनरेगांमधून तयार करणे प्रस्तावित आहे.
- स्वागत कमान:- शाळेच्या परिसरामध्ये प्रवेश करण्यासाठी सुंदर अशी स्वागत कमान करण्याचे ठरवलेले आहे. सदरची स्वागत कमान ही लोक सहभागातून करण्यात येत आहे.
- संगणक प्रयोगशाळा:- विद्यार्थ्यांना अत्याधुनिक असे तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळण्यासाठी शाळेमध्ये संगणक उपलब्ध असणे आवश्यक आहे,म्हणून आदर्श शाळांमध्ये एक संगणक प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे. सदर प्रयोगशाळेतील सर्व संगणक हे लोकसहभागातून उपलब्ध करून घ्यावयाचे आहेत.
- विज्ञान प्रयोगशाळा:- आदर्श शाळांमधील एका अतिरिक्त खोलीमध्ये विज्ञान प्रयोगशाळेची रचना करण्यात येणार आहे. सदरच्या विज्ञान प्रयोग शाळेतील वैज्ञानिक साहित्यांची उपलब्धता ही लोकसहभागातून व प्राप्त होणाऱ्या सी.एस.आर. मधून करण्यात येणार आहे. सदरची साहित्य मांडणी विद्यार्थ्यांना अध्ययनाला अनुकूल आणि पूरक असेल.
- शालेय ग्रंथालय:- विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी, त्यातून विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार घडावा यासाठी पुरेशी पुस्तके उपलब्ध असणे गरजेचे आहे. सदरची पुस्तके ठेवण्यासाठी आकर्षक कपाट तसेच वाचनालय मध्ये बसण्यासाठी डेस्क यांची व्यवस्था लोकसहभागातून करावयाची आहे.
- सोलर पॅनल:- आदर्श शाळांसाठी 207 शाळांना पारेषण संलग्न सौर उर्जा आस्थापीत करण्यात करीता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावीत करण्यात आलेले आहे. शाळेमध्ये शैक्षणिक तंत्रज्ञानासाठी विविध उपकरणांचा वापर करण्यात येतो. सदरसाठी शाळेला वीज जोडणी असते तथापि सदर साहित्य चा वापर जास्त झाल्यास अधिकचे वीज बिल येते हे टळावे म्हणून शाळेमध्ये सोलर पॅनल बसवण्याचे ठरवण्यात आलेले आहे.
- किचन शेड:- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेला एक किचनशेड असणे आवश्यक आहे. आदर्श शाळांमध्ये सदरचे किचन शेड हे दर्जेदार असे तयार करण्यात येत असून सदरच्या किचन शेड मधून शालेय पोषण आहाराची योजना राबविण्यात येणार आहे.
- परसबाग:- पोषण आहार लागू असणा-या सर्व जि.प. शाळांमध्ये परसबाग निर्मिती करण्यात आली आहे.
थोर महात्म्यांची व समाजसुधारक यांची जयंती / पुण्यतीथी कार्यक्रमांचे आयोजन
| अ.क्र. | जयंती / पुण्यतीथी | उद्दिष्ट |
| १. | स्व. यशवंतराव चव्हाण जयंती समारंभ | स्व. यशवंराव चव्हाण यांच्या कार्याचे यथोचित स्मरण व्हावे यासाठी त्यांचा जयंती समारंभ तालुका स्तरावर साजरा केला जातो. प्रत्येक तालुक्यातून लहान व मोठा गट यामधून प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक काढले जातात त्यांना बक्षीस वितरण केले जाते. |
| २. | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती नायगाव ता. खडाळा | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिवशी मोजे नायगाव येथे कार्यक्रम आयोजीत केला जातो. त्यामध्ये जिल्हयामधील विविध स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. |
| ३. | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व शाळा प्रवेश दिन साजरा करणे | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यथोचित कार्याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांचा जयंती समारंभ साजरा केला जातो प्रत्येक तालूक्यातून इ. ७ वीचे तीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाना बक्षीस दिली जातात तसेच ज्या सामाजिक सस्थेचे उत्कृष्ठ कार्य करणा-या सस्थेस पुरस्काराने सन्मानित केले जाते जयंती दिवशी प्रमुख वकत्याचे भाषण ठेवले जाते. |
| ४. | कै. आबासाहेब वीर जयंती | लोकनेते के. आबासाहेब वीर यांच्या यथोचित कार्याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांचा जयंती समारंभ पंचायत समिती पाटण मार्फत साजरा केला जातो. |
| ५. | स्व. मा. अभयसिंह राजेभोसले जयंती साजरी करणे | जिल्हयातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणेत येतो त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची आवड निर्माण होवून अभ्यास करण्याची जिद्द निर्माण होते. |
| ६. | म. ज्योतिबा फुले पुण्यतिथी कटगुण ता. खटाव | थोर महात्याम्यांची कार्याची ओळख निर्माण व्हावी यासाठी नामवंत वक्त्यांची व्याख्याने आयोजीत केली जातात. |
| ७. | लोकनेते बाळासाहेब देसाई जयंती साजरी करणे. | लोकनेते के. बाळासाहेब देसाई यांच्या यथोचित कार्याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांचा जयंती समारंभ पंचायत समिती पाटण मार्फत साजरा केला जातो. |
| ८. | हुतात्मा दिन साजरा करणे वडूज ता. खटाव | हुतात्मा दिनाचे यथोचित कार्याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांचा जयंती समारंभ तालुका स्तरावर साजरा केला जातो. प्रत्येक तालुक्यातून लहान व मोठा गट यामधून प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक काढले जातात त्यांना वक्षीस वितरण केले जाते. |
| ९. | क्रांतीसिंह नाना पाटील जयंती साजरी करणे. | क्रांतीसिह नाना पाटील यांच्या यथोचित कार्याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांचा जयंती समारंभ तालूका स्तरावर साजरा केला जातो. प्रत्येक तालुक्यातून लहान व मोठा गट यामधून प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक काढले जातात त्यांना बक्षीस वितरण केले जाते. |
| १०. | सुबेदार मल्हारराव होळकर जयंती साजरी करणे. | सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या यथोचित कार्याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांचा जयंती समारंभ तालूका स्तरावर साजरा केला जातो. |
| ११. | कै. किसनवीर जयंती समारंभ | कै. किसनवीर यांच्या यथोचित कार्याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांचा जयंती समारंभ पंचायत समिती वाई मार्फत साजरा केला जातो. |
सातारा जिल्हा परिषद, सातारा शिक्षण विभाग (प्राथमिक)
माहिती अधिकार (१७ सी)
कलम २ एच नमुना – अ
माहीतीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवार लोकप्रतिनिधी यांची यादी
शासकीय विभागाचे नांव – शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सातारा
| अ.क्र. | लोकप्राधिकारी संस्था | संस्था प्रमुखाचे पदनाम
|
ठिकाण / पत्ता
|
| १ | शिक्षण विभाग प्राथमिक | शिक्षणाधिकारी (प्राथमिक) | सातारा जिल्हा परिषद सातारा |
कलम २ एच नमुना – ब
शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थाची यादी
शासकीय विभागाचे नांव – शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सातारा
| अ.क्र. | लोकप्राधिकारी संस्था | संस्था प्रमुखाचे पदनाम
|
ठिकाण / पत्ता
|
| १ | शिक्षण विभाग प्राथमिक | शिक्षणाधिकारी (प्राथमिक) | सातारा जिल्हा परिषद सातारा |
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा




