खटाव तालुका

खटाव तालुका

खटाव हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे, असे असले तरी सर्व कार्यालये वडूज या ठिकाणी आहेत. पूर्वी संपूर्ण गावाभोवती तटबंदी होती. शिवाजी महाराज, लुत्फुल्लाखान, कृष्णराव ख्टावकर यांच्या अधिपत्याखाली हा भाग राहिलेला होता.

औंध

संस्थानिकांच्या जहागिरीचे औंध हे मुख्यालय होते. येथे पंतप्रतिनिधींचा मराठा स्थापत्य शैलीतील दुमजली वाडा आहे. किन्हईचे कुलकर्णी पदाचे वंशपरंपरागत अधिकार असलेले त्र्यंबक कृष्णा हे प्रतिनिधी घराण्याचे पूर्वज. या घराण्यातील रामचंद्र अमात्याच्या पदरी परशुराम त्रिबकयांना छत्रपती राजाराम यांनी १६९० मध्ये सरदारकी आणि सुभालष्कर व समशेरजंग हे किताब दिले होते. डोंगरावर श्री. यमाई देवीचे मंदिर आहे.

औंध वस्तूसंग्रहालय

८ हजारपेक्षा जास्त वस्तू असलेले हे वस्तू संग्रहालय १९३८ साली बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी बांधले. विविध प्रदेशात निर्माण झालेली व त्या त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये सांगणारी चित्रे, संगमरवरातून कोरलेली शिल्पे, कोरीव काम केलेली धातूची, लाकडाच्या वस्तू, हस्ती दंत कोरीव कराकृती आणि स्ट्राँगरुमधील दुर्मिळ मौलिक ऐतिहासिक रत्न यांचे दुर्मिळ दर्शन या ठिकाणी पहावयास मिळते. आता ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व वस्तुसंग्रहालय विभागाच्या ताब्यात आहे.

यमाई मंदिर

औंध गावाशेजारी मूळपीठ नावाचा ८०० फूट उंचीचा डोंगर आहे. त्यावर औंधची ग्रामदेवता तसेच प्रतिनिधी धरणाची कुलदेवता यमाई देवीचे मंदिर आहे. यमाईदेवी महाराष्ट्रातील पंचमहादेवतांपैकी एक आहे.

पुसेगाव

येरळा नदीच्या तीरावर पुसेगाव वसले आहे. नाथपंथियांच्या अकरा लिगापैकी एक येथे आहे. येथे सेवागिरी महाराजांची समाधी आहे. त्यांनी अनेक कल्याणकारी कामे करुन १० जानेवारी १९४७ मध्ये समधी घेतली.

पुसेसावळी

येथील आयाचित घराण्यातील पूर्वज श्री. पांडूरंग आयचित यांना आळंदीकडून दोन अजानवृक्ष व ज्ञानेश्वरांची मूर्ती प्राप्त झाली. आज या ठिकाणी दोन अडीचशे वृक्ष आहेत या ठिकाणी असलेली ज्ञानेश्वरांची मूर्ती वैशिष्ट्येपूर्ण आहे.

मायणी

या ठिकाणी असलेला तलाव हा १०० वर्षांपेक्षाही जुना आहे. या दुष्काळी भागातील शेतीला पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने हा तलाव बांधण्यात आला. वनखात्याच्या मार्फत या तलावाच्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वृक्ष वाढवून या परिसराचे अरण्यात रुपांतर केले आहे. म्हणजेच या ठिकाणी पक्षांसाठी विविध प्रकारचे खाद्य आणि निवार्‍यासाठी उंच झाडी व झुडपे अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केवळ देशातीलच नव्हेतर परदेशतील नाना प्रकारचे पक्षीवृंद येथे हिवाळ्यात असर्‍यासाठी येतात. गरुड, ससाणा, फ्लेमिगो (रोहित, विविध जातीची बदके) सारस (कारकोचे) इ. पक्षांची संख्या मोठी असते. पाण्यात बुड्या मारणारे पाणबुडे तसेच पाण्यावरुन पळत जाणारे नाम्यापक्षी येथे पहायला मिळतात. १.५ हेक्टर परिसरात हे विस्तारलेले अभयारण्य म्हणजे इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य होय.

कुरोली सिध्देश्वर

खटाव, येरळा नदीवरील सिध्देश्वराचे प्राचीन मंदिर आहे. पिडीवर अभिषेकाची धार घरल्यावर शिट्टीसारखा शिवनाद निघतो. त्याला सिहनाद म्हणतात. भारतातील शिवस्थानांपैकी शिवनाद करणारे हे एकमेव स्थान आहे.

गुरसाळे

वडूज पासून ९ कि.मी. असणारे गाव म्हणजे गुरसाळे या गावात १३ व्या शतकातील रामलिग मंदिर आहे. तसेच एक सोमलिग मंदिर ही आहे.

नेर तलाव

पुसेगाव जवळ नेर गावाच्या छोट्याशा गावात एक ब्रिटीश कालीन तलाव असून नेर तलाव म्हणून तो ओळखला जातो. ब्रिटीश आमदानीत व्हिक्टरिया राणीच्या काळात इ.स. १८७३ मध्ये या धरणाचे बांधकाम इरिगेशन डिपार्टमेंटकडून झाले आहे. या तलावाच्या मध्यभागी टेकडी असून तयावर चैतोबाचे मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी एक पायवाट आहे. या वाटेचे वैशिष्ट्ये असे की धरणातील पाणी वाढले तरी रस्ता पाण्याखाली कधीही जात नाही.

कटगुण

थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले यांचे जन्मगांव.