माण तालुका

माण तालुका

दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण आहे. माण हे गावाचे नाव नसून संपूर्ण प्रांताला माण संबोधले जाते. माणदेश हा कायम दुष्काळाची सावट असलेला भाग. म्हसवड येथे सर्वत्र जुन्या पध्दतीची विशिष्ट स्थापत्य रचनेची धाब्याची घरे पहावयास मिळतात.

गोंदवले

माण तालुक्यात सातारा - म्हसवड मार्गावर दहिवडी गावापासून पुढे सातार्‍यापासून ७० कि.मी. अंतरावर गोंदवले हे गाव आहे. यालाच रामदेव संस्थान असे संबोधतात. नामपूजेचा व अन्नदानाचा महिमा सांगणारे श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म व समाधीस्थान जेथे आहे. गोंदवलेकर महाराजांनी लोकांना भक्तीमार्गाची वाट दाखवली. नामोपसणेचा मार्ग दाखविला आणि आण्णदानाचा महिमा सांगितला. या मंदिराच्या गाभार्‍यातील तळमजल्यामध्ये महाराजांची समाधी आहे. पायर्‍या उतरुन तिचे दर्शन घ्यावे लागते. या समाधीच्या वर श्रीराम, लक्ष्मण, सिता व मारुती यांच्या सुंदर मुर्ती आहेत. मंदीराच्या सभागृहात भजन प्रवचनादी नित्य कार्यक्रम सतत चालू असतात. या मंदीराच्या उत्तरेला दोन मोठे हॉल असून तेथे भक्तांना महाप्रासाद दिला जातो. या हॉलच्या पश्चिमेला दोन उंच व अवाढाव्य अशा इमारती असून तेथे भक्तं निवासाची सोय केली जाते. येथीला मंदिराचे संपूर्ण बांधकाम आधुनिक पध्दतीचे असून १९३६-३७ मधील आहे.

म्हसवड

सातारा पंढरपूर मार्गावर माण तालुक्यातील म्हसवड हे तालुक्याचे गाव आहे. येथे प्रसिध्द असे श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांचे मंदीर आहे. दरवर्षी मार्गशिर्ष शुध्द प्रतिपदा या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. त्यादिवशी त्याची मोठया राथतून मिरवणूक काढतात. त्यापूर्वी कार्तिक शुध्द प्रतिपदा ते व्दादशी असा बारा दिवस श्री. सिध्दनाथ व देवी जोगेश्वरी यांचा लग्नसोहळा साजरा केला जातो. देवालयाच्या सभामंडपात लोखंडी जाळीमध्ये पाषाणाची हत्तीची मुर्ती स्थापली आहे. मुख्य शिखराची उंची १०० फूटाहून अधिक आहे. श्री. सिध्दनाथ म्हणजे कालभैरव हे शंकराचे रुप आहे. त्यांच्या हातात त्रिशुल, डमरु, शिगी ही आयुधे आहेत. गळयात रुद्राक्ष व नरमुंडमाळ आहे. डाव्या हातात दैत्य शिर आहे. त्यातून पडणारे रक्त कुत्रा प्राशन करीत आहे. सिध्दनाथाच्या कमरेला व डोक्याला शेष आहे. माता जोगेश्वरी हे पार्वतीचेच एक रुप आहे. तिच्या हातात त्रिशुल,डमरु,शेष ही आयुधे आहेत. पायाजवळ सिध्दनाथाचा मुलगा अग्नीबाळाची मुर्ती आहे. सिध्दनाथाच्या दर्शनासाठी दर रविवार विशेष गर्दी असते. श्री. सिध्देश्वर हे कर्नाटक व आंध्र प्रदेशातील अनेकांचे कुलदैवत आहे.

शिखर शिगणापूर

पुराण, इतिहास, धर्म आणि राजकारण यांचा ससमन्वय साधणारे शिखर शिगणापूर सातारा व सोलापूर जिल्हयांच्या सीमेवर महादेव डोंगररांगांच्या शिखरावर शंभू महादेवाचे जागृत देवस्थान आहे. मंदिरात शिव व पार्वती दोघांचीही लिगे आहेत. चैत्रशुध्द पंचमीस येथे शिवपार्वतीचे लग्न लागते. येथे कावडीने पाणी आणून मूर्तीवर धार धरण्याची प्रथा आहे.