सातारा तालुका

सातारा तालुका

कास तलाव व बामणोली

साता-यापासून पश्चिमेला यवतेश्वर मार्गे २७ कि.मी. अंतरावर समुद्रसपाटीपासून १४३० मी. उंचीवर कास पठार लागतो. या तलावात अनेक नैसर्गिक झरे असल्यामुळे बारामाही पाणी असते. या तलावातून सातारा शहराला पाणी पुरवठा केला जातो. या पठारावर जांभूळ, करवंदे, फणस, आंबा, हिरडा व अनेक दुर्मिळ औषधी झाडे अस्तित्वात आहेत. कासपासून फक्त १२ कि.मी. अंतरावर बामणोली हे निसर्गप्रेमिचे आवडते ठिकाण आहे. नौकाविहार करण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण आहे.

कास तलाव व बामणोली
कास तलाव व बामणोली
 

चाळकेवाडी व वनकुसवडे

सातारा जिल्हा, ऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द पावला तो चाळकेवाडी व वनकुसवडे पठरावरील पवनऊर्जा प्रकल्पामुळे, ५० मीटर उंचीच्या मनो-यावरुन तीन पात्यांच्या विड टर्बाईनव्दारे वा-याच्या गतिज ऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्र फिरविले जाते. यातून पवन ऊर्जा निर्माण केली जाते. आशिया खंडातील सर्वात मोठा प्रक्ल्प येथे साकारला जात आहे. ८५७ पवन विद्युत जनित्रांच्या सहाय्याने ३१३ मेगावॅट वीज निर्माण केली जाते.

ठोसेघर

येथील धबधबे व सभोवतालचे निसर्ग समृध्द वातावरण यामुळे हे ठिकाण महत्वाचे पर्यटन केंद्र आहे. ठोसेघरचा मुख्य धबधबा ६०० फूट खोल दरीत पडताना पाहणे रोमांचकारक आहे. धबधबा पाहताना या ठिकाणी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटना थांडविण्यासाठी या ठिकाणी अलीकडच्या काळात निरीक्षण गॅलरी आणि संरक्षण तारेच्या भितींची सोय करण्यात आली आहे.

ठोसेघर

माहुली

कृष्णा व वेण्णा नद्यांच्या संगमावरील पवित्र क्षेत्र. माहुली येथे कृष्णा नदी गावाच्या मधून वाहते. त्यामुळे श्रीक्षेत्र माहुली व संगम माहुली असे गावाचे दोन भाग पडतात. याठिकाणी श्रीमंत शाहू महाराजांची समाधी आहे. यवतेश्वर व मंगळागौरी, राधाशंकर, बिल्वेश्वर,रामेश्वर ही मंदिर प्रसिध्द आहेत. पेशवाईत नावाजलेले न्यायाधीश रामशास्त्री प्रमुणे यांचे हे जन्मगांव. येथे शाहू महाराजांचा लाडका कुत्रा खंडयाची समाधी आहे व राणी ताराबाईचे स्मारक आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सायराबाई सती गेली. त्याचे स्मरण म्हणून नदीशेजारील वाळवंटात दोन शिलिगे स्थापन करण्यात आलेली आहेत.

यवतेश्वर

निसर्गरम्य परिसरात हेमाडपंथी शिवालय आहे. या डोंगराची समुद्रसपाटी पासून उंची १२३० मीटर आहे. डोंगराच्या उत्तर बाजूच्या टेकडीवर भैरोबाचे मंदिर आहे. त्यास पेढयाचा भैरोबा म्हणतात.

पाटेश्वर

पाटेश्वर हे स्थळ साता-यापासून ७ मैलाच्या अंतरावर आग्नेय दिशेस एका टेकडीवर आहे. पाटेश्वर हे ठिकाण मुख्यतः महादेवाच्या मंदिरासाठी प्रसिध्द आहे. मठ, मंदिरे, गुहा व मूर्ती हे पर्यटकांचे आकर्षण आहे. हे मंदिर पेशवेकालीन सावकारपरशुराम नारायण अनघळ यांनी छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीत बांधले.

सज्जनगड

समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण. या ठिकाणी समर्थांची समाधी आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव परळी होते. हा किल्ला १६७६ मध्ये शिवाजी महाराजांनी जिकला होता. समर्थांच्या वास्तव्यामुळे परळीचे नाव सज्जनगड झाले. दास नवमीला येथे मोठा उत्सव असतो. गडावर सतत पाणी असणारी दोन तळी सुध्दा आहेत. अंगापूर डोहात सापडलेल्या मूर्तीचे आंगलाईचे मंदिर, पडकी मशिद, धर्मशाळा, समर्थांचा मठ, श्री. राम मंदिर व त्यांच्या तळघरात समर्थांची समाधी प्रेक्षणीय आहे. शेजघरात समर्थांनी वापरलेल्य वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये तांब्याचा मोठा हंडा, लोटा, कुबडी, गुप्ती आदी वस्तू त्याचप्रमाणे छ. शिवरायांनी समर्थांना भेट दिलेला पलंग पहावयास मिळतो. समर्थ रामदास महाराज ध्यानास बसत ती जागा रामघळ.

सज्जनगड

धावडशी

साता-याच्या वायव्येस असणारे धावडशी गाव ब्रम्हेंद्र स्वामींना १९२८ मध्ये छत्रपती शाहंकडूल इनाम म्हणून मिळाले होते. ब्रम्हेंद्र स्वामी छत्रपती शाहूंचे राजगुरु व पेशव्यांचे गुरु होते. सन १९४५ मध्ये ब्रम्हेंद्र स्वामी निवर्तल्यानंतर छत्रपती शाहूंनी त्यांच्या समाधीवर हे मंदिर बांधले. घ्मेरी झाशी नही दूँगीङ असे ठणकावून सांगणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई धावडशीच्या तांबे कुटुंबातल्याच. आज ही येथे त्यांच्या वाडयाचे अवशेष पहावयास मिळतात.

मर्ढे

बा. सी. मर्ढेकर यांचे मूळ गांव. या गावात इ.स.वी सन १७०९ मध्ये छत्रपती शाहू महाराजांची छावणी होती. कृष्णा नदीच्या काठावरच सिघ्दामृत मठाची गढीवजा भव्य दगडी वास्तू उभी आहे. समर्थ रामदास स्वामींनी या मठाची स्थापना केली आहे. मठाचे तिसरे मठपती अमृतेश्वर यांनी पियुष रामायण कविताबध्द तसेच तत्वझाडा हा प्राकृत ग्रंथ लिहीला. पूर्वी या मठात सिध्दामृत विद्यापीठ होते.

शिवथर घळ

समर्थांनी ज्या ठिकाणी दासबोध लिहला ते ठिकाण म्हणजे शिवथर घळ. भोर मार्गे महाडला जाताना वरंधा घाटाच्या अलिकडे शिवथर घळ लागते.

शिवथर घळ

महादरे तलाव

सातारा शहराच्या पश्चिमेला यवतेश्वर डोंगराच्या पायथ्याशी प्रतापसिह महाराजांनी हा तलाव बांधला.याची लांबी ८७ मीटर, रुंदी ८६ मीटर व खोली १० मीटर आहे. हा तलाव संपूर्ण घडीव दगडांनी बांधून घेण्यात आला आहे. या तलावाच्या दक्षिणेला हत्ती जलाव आहे.

कण्हेर धरण, कण्हेर

सातारा तालुक्यात कण्हेर गावाजवळ वेण्ण नदीवर हे धरण १९७६ ते १९८८ मध्ये बांधण्यात आले. हे धरण मातीचे असून त्याची लांबी १३५५ मीटर आहे.

सातारा

अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी शाहू महाराजांनी बसविलेले ऐतिहासिक शहर १६९९ साली या शहरास छत्रपती शाहूंच्या राजधानीचा मान मिळाला.

 

सातारा शहर परिसरातील महत्वाची स्थळे

 

अजिंक्यतारा

सातारा शहराच्या दक्षिणेला असलेला मोठा किल्ला अजिंक्यतारा. अजिमतारा किवा मंगळाईचा डोंगर या नावाने ही ओळखला जातो. पूर्वी या किल्ल्यावरुन शहर व सभोवतालच्या विस्तीर्ण प्रदेशावर मावळे देखरेख करीत असत. या किल्ल्याच्या उतारावर शहराचा बराचसा भाग वसला आहे. शिलाहार वंशीय राजा दुसरा भोज याने ११९० मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. १६९८ मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी सातारा ही मराठी राज्याची राजधानी जाहीर केली. आज या ठिकाणी मंगळादेवीचे मंदिर व पाण्याची सात तळी आहेत.

अजिंक्यतारा

चार भिती

अजिंक्यता-यालगत असलेल्या टेकडीवर चार भिती येथे १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दात आहुती देणा-या वीरांच्या स्मरणार्थ स्मारक स्तंभ उभारण्यात आला आहे. हा स्तंभ ३० फूट उंचीचा असून त्याभोवती चारी बाजुंना १० फूट उंचीच्या चार भिती व त्याभोवती छोटी तटबंदी आहे. या ठिकाणी झाशीची राणी लक्ष्मीबाई व प्रतापसिह महाराजांचे वकिल रंगो बापूजी गुप्ते यांचे अर्धपुतळे आहेत. स्तंभाच्या डाव्या बाजूवर १८५७ च्या धामधुमीतला हिदुस्तानचा नकाशा तर उजव्या बाजूला भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ठळक घटना सालासहित दिल्या आहेत.

चार भिती

जुना राजवाडा

छत्रपती प्रतापसिह महाराज (पहिले) यांनी हा वाडा बांधला. सध्या या वाड्यात जिल्हा परिषदेचे प्रतापसिह हायस्कूल सुरु आहे.

नवा राजवाडा

आप्पासाहेब महाराज यांनी जुन्या राजवाड्याला लागूनच नवा राजवाडा बांधला आहे. या वाडयात पूर्वी कोर्टाचे कामकाज चालत असते. सध्या इतर शासकीय कार्यालये आहेत.

छत्रपती शिवाजी संग्रहालय

या ठिकाणी दुर्मिळ ऐतिहासिक पुरातन वस्तुंचा संग्रह आहे. हे वस्तु संग्रहालय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे. या संग्रहालयात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींनी वापरलेल्या वस्तु, साधने, शस्त्रे आणि पोशाखांचा संग्रह आहे. येथे भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राने, चिलखते,तलवारी, तोफगोळे, अंकुश, परशु, गुप्ती, धनुष्यबाण, किल्ल्याचा दरवाजा फोडण्यासाठी हत्तीकडून वापरावयाचेशस्त्र, सोनसळी,पडदे, गुप्तीचे प्रकार, रणशिग, जेडची मठ, बिचवा, पालखीच्या दांड्यावरील मानचिन्ह, वाघनखे, बंदुकांचे प्रकार, दारुच्या पुड्याचा शिगाडा, संगीनी, पिस्तुले इ. विविध प्रकारची युध्द साहित्य व साधने येथे मांडलेली आहेत. वस्त्र विभागामध्ये अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, साडया, पैठणी, फेटे, बख्तर,बाहू, आच्छादने, तुमान अनेक प्रकारच्या पगड्या, शेला, इ. समावेश होतो. या संग्रहालयामध्ये शिवाजी महाराजांची वंशावळ लावली आहे.

नटराज मंदिर

दक्षिणात्य शैलीचे उत्तर चितंबरम हे चार गोपुरांचे मंदिर कृष्णानगर याठिकाणी आहे. शामराव शानभाग यांनी हे मंदिर स्वखर्चातून बांधले आहे. मूर्ती-प्रतिष्ठापना कांची पीठाचे अधिपती श्री. नरेंद्र सरस्वती यांचे हस्ते करण्यात आली. या मंदिरात नटराजाची पंचधातूची साडेचार फूटी उंचीची मूर्ती आहे. मंदिर समूहाच्या भेावताली चौकोनी आकाराची उंच तटभित आहे. या तटिभितीला चार मुख्य दिशांना प्रत्येकी पासष्ट फूट उंचीची चार गोपुरे आहेत. त्यांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश सरकारने खर्च दिल्याने त्यांना त्यांची नावे देण्यात आली आहेत.

श्री. कुरणेश्वर मंदिर

पहिले बाजीराव पेशवे यांचे मेहुणे कृष्णाची चासकर यांनी १७२३ मध्ये हे दगडी मंदिर बांधले. शहराच्या पश्चिमेला परळीकडे जाताना बोगद्याच्या बाहेर १ मैलावर खिडीच्या गणपतीचे देवस्थान आहे. गणपतीची स्वयंभूमूर्ती असून कुरणेश्वर या नावाने ओळखली जाते.

आयुर्वेदिक अर्कशाळा

कै. डॉ. मो.ना. आगाशे यांनी स्थापन केलेली आयुर्वेदिक अर्कशाला लि. ही संस्था अनुभवसिध्द आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करते. या संस्थेची स्थापना १९२६ साली ८२ वर्षे अनुभव असलेली ही संस्था १२० ते १३० प्रकारची जुनी/नवी आयुर्वेदिक औषधे व शक्तीद्रव्ये तयार करीत आहेत.सर्वांना उपयुक्त अशी औषधे तयार करणारी अर्कशाळा साता-याचे भूषण आहे. हे ठिकाण म्हणजे पूर्वी तख्ताचा वाडा येथे होता. तेथे छत्रपतींचे सिहासन होते व दरबारही भरत असे.

धननीची बाग शाहू बोर्डींग

इसवी सन १९२४ साली सातारा शहरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी छत्रपती शहू बोर्डींग हाऊस नावाचे छात्रालय सुरु करण्यात आले. कमवा व शिका या योजनेव्दारे स्वालंबनाचे आणि शिस्तीचे संस्कार या छात्रालयातील विद्यार्थ्यांवर केले जाऊ लागले.

महानुभव मठ

महानुभव पंताचे प्रणेते श्री. चक्रधर स्वामी आहेत. इ.स.१९१२ साली स्व. बाबा मोतीवाले यांनी या मळाची स्थापना केली. एकेश्वर वादाचा सिध्दांत हा महानुभावी पंथाचा मूलाधार आहे. या मठात नामस्मरण, चितन, मनन, पठण, चचग आदि भक्ती मार्ग अनुसरले जातात.

शहरातील अन्य ठिकाणे

प्रतापसिह उद्यान,शाहू उद्यान, भैरोबा मंदिर, गारेचा गणपती, पंचमुखी गणपती, ढोल्या गणपती, गोल मारुती मंदिर,फाशीचा वड, शाही मसजिद, अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च, फुटके तळे, क्रांतीस्तंभ ही प्रेक्षणिय स्थळे आहेत.